मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. राज्यात पुन्हा भाजप-शिवसेना युतीची सत्ता आणण्यासाठी या दोन्ही पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. विधानसभा निव णुकीच्या पार्श्वभूमीवर युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी जन आशीर्वाद यात्रा काढली असतानाच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. त्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस हे 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट अशी महिनाभर महाजनादेश यात्रा काढणार आहेत.
.लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकाही भाजप-शिवसेना एकत्रितपणे लढवणार आहे. विधानसभा निवडणुकीतही सेना-भाजप युती कायम राहणार असल्याचे दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी जाहीर केले असले तरी मुख्यमंत्रिपदावरून या दोन्ही पक्षांमध्ये धुसफूस सुरू आहे. त्यात युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदासाठी प्रोजेक्ट केले जात आहे. तसे सुतोवाच शिवसेन नेते खा.संजय राऊत यांनी नुकतेच केले. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथून 18 जुलैला जन आशीर्वाद यात्रा सुरू केली. या यात्रेदरम्यान आदित्य ठाकरे हे 4 हजार किलोमीटरचा प्रवास करणार असून, या यात्रेत ते ठिकठिकाणच्या सेना कार्यकर्त्यांशी व नागरिकांशी संवाद साधत आहेत. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला मतदान करणार्या मतदारांचे आभार मानण्यासाठी ही यात्रा काढली असल्याचे ते सांगत असले तरी विधानसभेवर भगवा फडकवण्यासाठी व सेनेची ताकद वाढविण्यासाठी ही यात्रा काढण्यात आल्याचे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे.दुसरीकडे राज्यातील सत्ता पुन्हा काबीज करण्यासाठी भाजपने व्यूहरचना आखली आहे. त्याअंतर्गत विरोधी पक्षातील मातब्बर नेत्यांना भाजपमध्ये आणण्याचा तसेच जनाधार वाढविण्याचा प्रयत्न सुरू आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री फडणवीस हे 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्टदरम्यान महाजनादेश यात्रा काढणार असून, भाजपचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हेदेखील महाजनादेश यात्रा काढणार आहेत.
अबकी बार २२० के पार- चंद्रकांत पाटील
आगामी विधानसभा निवडणुकीत 220 पेक्षा अधिक जागा जिंकून राज्यातही पुन्हा सत्ता मिळविण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन महसूलमंत्री व भाजपचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. मुंबई येथे आयोजित भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे.पी. नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर, रावसाहेब दानवे, मुंबई भाजपा अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे, शालेय शिक्षणामंत्री आशिष शेलार आदी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला केंद्रीय मंत्रिमंडळात पुन्हा संधी दिली. एक व्यक्ती एक पद या धोरणानुसार मी पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. माझे प्रदेशाध्यक्षपद गेल्याने मी अजिबात नाराज नाही, असे रावसाहेब दानवे यावेळी म्हणाले. भाजपच्या झंझावातामुळे काँग्रेसची अवस्था बर्मुड्यासारखी झाली आहे. काँग्रेसला आता सक्षम नेताच उरलेला नाही, असेही ते म्हणाले.चंद्रकांत पाटील म्हणाले, ईव्हीएम व वंचित बहुजन आघाडीमुळे लोकसभा निवडणुकीत भाजपला यश मिळाले, हे काँग्रेस-राष्ट्रवादीचे म्हणणे चुकीचे आहे. बूथ रचना व मजबूत संघटनेच्या बळावर तसेच पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री फडणवीस यांनी गेल्या पाच वर्षात केलेल्या विकास कामांमुळे भाजपला घवघवीत यश मिळाले. काँग्रेस व राष्ट्रवादीने येत्या विधानसभा निवडणुकीत स्वतंत्र लढावे म्हणजे त्यांना त्यांची खरी ताकद कळेल.